

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विकासकामांमध्ये मक्तेदारांची तब्बल 50 कोटी रुपयांची थकबाकी गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असल्याने अखेर संतापाचा उद्रेक झाला आहे. महापालिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने 1 मेपासून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, या आंदोलनात 300 हून अधिक मक्तेदार सहभागी होणार आहेत.
महापालिकेच्या झोन क्रमांक 1 ते 8 अंतर्गत भांडवली, देखभाल-दुरुस्ती तसेच विविध विकास योजनांची कामे पूर्ण करूनही संबंधित बिलांचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप मक्तेदारांनी केला आहे. या संदर्भातील बिले मुख्य लेखापाल कार्यालयाकडे सादर करण्यात आली असली तरी निधीअभावी ती प्रकरणे रखडली आहेत. परिणामी, आर्थिक ताण वाढल्याने मक्तेदारांना कामे सुरू ठेवणे कठीण झाले आहे.
कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामकृष्ण दुधाळ यांनी सांगितले की, महापालिकेने तत्काळ ठोस धोरण ठरवून थकबाकी अदा करावी, अन्यथा 1 मेपासून कोणतेही काम केले जाणार नाही. या इशाऱ्यामुळे शहरातील सुरू असलेल्या तसेच नियोजित विकासकामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रशासनाने यावर अद्याप ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र, मक्तेदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महापालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. 1 मेपासून कामबंद आंदोलन सुरू झाल्यास शहरातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवा यावर थेट परिणाम होणार असल्याने, आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.