

सोलापूर : शालेय विद्यार्थ्यांसाठी बालमेळावा, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर घेण्यासह विविध विषयांना सोलापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत एकमताने मान्यता देण्यात आली. या उपक्रमासाठी खर्चाच्या तरतुदीला यावेळी मंजुरी देण्यात आली.
सोलापूर महापालिका महिला व बालकल्याण समितीची सभा सभापती निर्मला जंगम यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडली. याप्रसंगी नगरसचिव प्रवीण दंतकाळे, महिला व बालकल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे यांच्यासह समिती सदस्या उपस्थित होत्या. यावेळी तातडीची आणि नियमित अशा दोन सभा घेण्यात आल्या. महिलांना संगणक साक्षर बनविण्याच्या दृष्टीने २०२६-२७ या आर्थिक वर्षात मोफत एमएससीआयटी प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी एकूण २ हजार ९०४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ हजार ७९३ अर्ज पात्र, तर १११ अर्ज अपात्र ठरले आहेत. पात्र लाभार्थी महिलांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपयांप्रमाणे एक कोटी ३९ लाख ६५ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी इतर अनुषंगिक योजनांच्या निधीतून समायोजन करण्यास मंजुरी देण्यात आली.
महानगरपालिका शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात बालमेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सात लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच शहरातील मुली, महिला आणि बालकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यास मंजुरी देण्यात आली. महापालिका रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालिकांना बेबी किट वाटप करण्याच्या उपक्रमासाठीही आठ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. महिला व बालकांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सभेत चर्चा झाली, अशी माहिती सभापती निर्मला जंगम यांनी दिली.
शिलाई मशीनसाठी २५ लाखांची तरतूद
शिवणकला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना शिलाई मशीन खरेदीसाठी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णयही घेण्यात आला. यासाठी २०२६-२७ च्या मंजूर आराखड्यात २५ लाख रुपयांची तरतूद उपलब्ध असून पात्र महिलांकडून अर्ज मागवून योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे सभापती निर्मला जंगम यांनी सांगितले.