Solapur Airport: सोलापूर ते मुंबईसह ८ हवाई मार्गांवरील विमानसेवा बंद

मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन
Solapur air service
Solapur air service Pudhari File Photo
Published on
Updated on

सोलापूर : स्टार विमान कंपनीकडून सोलापूर ते मुंबई विमान सेवा बंद केल्याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्टार एअर विमान कंपनीला विचारणा केली असता त्यांच्याकडून कंपनीने खुलासा दिला असून, सहा महिन्यांत इंधनाच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात सोलापूर ते मुंबईसह ८ इवाई मार्गांवरील विमानसेवा बंद केल्याचा खुलासा दिला आहे.

कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या खुलाशात म्हटले आहे की, विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण देत स्टार एअरने ही सेवा बंद केली आहे. सोलापूर ते मुंबई विमान सेवेसह नांदेड ते मुंबई, बेळगाव ते मुंबई तसेच गुजरात ओडिशा या राज्यांतूनही विमान सेवा बंद करण्यात आल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून विमान वाहतूक क्षेत्राला विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, वाढत्या इंधन दराचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसत आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये विमान इंधनाची किंमत सुमारे ६० रुपये प्रतिलिटर होती. सप्टेंबर २०२६ मध्ये ही किंमत वाढून सुमारे १२२ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्यामुळे तुलनेने छोटी विमान कंपनी असलेल्या स्टार एअरला वाढत्या इंधन खर्चाचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे.

सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे कंपनीला प्रतिमहिन्याला मोठे नुकसान होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. राज्य शासनाकडून कंपनीला विविध माध्यमातून मदत करण्यात आली असून, फंडिंगमध्ये वाढ केल्यामुळे काही प्रमाणात नुकसान भरून काढण्यास मदत झाली. मात्र, इंधनाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या अत्यंत जिकिरीचे झाले आहे.

या वाढत्या खर्चामुळे सोलापूर-मुंबई विमानसेवा सध्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती स्टार एअरकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरच्या विमानसेवेला पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा मोठा फटका बसला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news