

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने गट क वर्गासाठी रविवारी (दि. 1) घेण्यात आलेल्या परीक्षेला दोन हजार 79 परीक्षार्थी गैरहजर राहिले. या परीक्षेस 5 हजार 599 उमेदवारांनी अर्ज भरले होते. यात 3 हजार 520 उमेदवारांनी जिल्ह्यातील 15 केंद्रांवर उपस्थित राहून परीक्षा दिल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निर्हाळी यांनी दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 रविवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत जिल्ह्यातील 15 केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेच्या आयोजनासाठी 15 उपकेंद्रप्रमुख, 77 पर्यवेक्षक, 264 समवेक्षक, 30 लिपीक, 15 केअरटेकर,134 शिपाई, पाणीवाले, स्वच्छक, बेलमन असे एकूण 535 कर्मचारी परीक्षा कर्तव्यावर होते. परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस आयुक्तालयांकडून पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. यंदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परीक्षेस पोहचण्यास तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये यासाठी दीड तास आधीच परीक्षार्थिंना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. परंतू रविवारी कुठेही पाऊस नव्हता. बंदोबस्तासाठी सहा पोलिस निरीक्षक, 49 पुरुष पोलिस अंमलदार, 30 महिला पोलिस अंमलदार 30 तैनात केले होते.