

सोलापूर : महागाईने उच्चांक गाठला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही अद्याप मदत मिळालेली नाही. जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे सरकार विकासाच्या घोषणा करण्याऐवजी मोर्चे काढण्यात व्यस्त असल्याची टीका खा. प्रणिती शिंदे यांनी केली.
राज्यातील आरोग्यसेवा, महागाई, शेतकरी प्रश्न, उजनी डेटा सेंटर प्रकल्प आणि भाजपच्या राजकीय भूमिकेवर खा. शिंदे यांनी भाष्य करत भाजपवर मंगळवारी (दि. ३) पत्रकार परिषदेत टीका केली. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, मल्लिकार्जुन पाटील, भीमाशंकर दमशेट्टी, भारत जाधव, नरसिंग आसादे, तिरुपती परकीपंडला उपस्थित होते. खा. शिंदे म्हणाल्या, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महा लॅब, मोफत डायलिसिस आणि आपला दवाखाना या सेवा निधीअभावी संकटात सापडल्या आहेत.
एचएलएल लाईफ केअर लिमिटेड या कंपनीची तब्बल एक हजार ६७ कोटी २७ लाख रुपयांची देयके सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रलंबित आहेत. त्यामुळे एक नोव्हेंबरपासून राज्यातील अनेक भागांत महा लॅब, आपला दवाखाना आणि डायलिसिस केंद्रांच्या सेवा बंद पडल्याचे चित्र आहे. लोकप्रिय योजनांवर वर्षाकाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे मात्र गोरगरीब रुग्णांच्या आरोग्यसेवांसाठी निधी नाही, अशी टीका त्यांनी केली.
डेटा सेंटर, टोरंट प्रकल्प लादल्याचा दावा
उजनी डेटा सेंटर प्रकल्पाबाबत सरकारकडून अपूर्ण माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. प्रकल्पामुळे परिसरातील शेतकरी, मासेमारी आणि अनेक गावांच्या विस्थापनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भीमाशंकर परिसरातील पर्यावरणीय हस्तक्षेपाचा दाखला देत भाजप सरकारच्या विकासाच्या संकल्पनेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सत्ता वाचविण्यासाठी मोर्चे
भाजपकडून ‘संविधान वाचवा, अराजकता हटवा’, असा नारा देत मोर्चे काढले जात आहेत; मात्र प्रत्यक्षात त्यांनी ‘आमचे सरकार वाचवा’, असा नारा द्यायला हवा. तरुण विद्यार्थी आंदोलकांवर लाठीमार आणि पॅलेट गनचा वापर करण्याचे आदेश देणारे गृहमंत्री अमित शाह संविधान वाचवण्यासाठी मोर्चे काढत आहेत. यापेक्षा राजकारण कोणते, असा सवाल त्यांनी केला. मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातील प्रश्नांवर सरकार मौन बाळगते, अशी टीकाही त्यांनी केली.