

मोहोळ शहर : मोहोळ तालुक्यातील १०४ गावांमध्ये पावसाने ४५ दिवसांहून अधिक काळ दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने खरीप हंगाम २०२६ साठी ट्रिगर-१ लागू करण्यात आला असून, प्रांताधिकारी नितीन इथापे, यांच्या मार्गदर्शनाखाली १०४ गावात पीक नुकसानीच्या संयुक्त पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे.
तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सचिन मुळीक, तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे आणि गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड यांच्या समन्वयातून पंचनाम्यांची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अनगर, नरखेड, सावळेश्वर, कामती, वाघोली, टाकळी सिकंदर, पेनूर आणि शेटफळ अशी ८ महसूल मंडळे सजा .. ४६ असून, खरीप पिकांचे एकूण क्षेत्र १६ हजार ८१८ हेक्टर आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन, मका, तूर आणि चारा पिके सुकून गेल्याने उत्पादन घटण्याचे संकट निर्माण झाले आहे. २८ सप्टेंबर रोजीच्या शासन आदेशानुसार ट्रिगर-१ लागू झालेल्या १०४ गावांमध्ये नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ई-पीक पाहणी मोबाइल ॲपद्वारे आपल्या पिकांची नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पीक पंचनाम्याच्या कार्यवाहीसाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, ८-अ, आधार लिंक असलेले बँक पासबुक, आधारकार्ड आणि फार्मर आयडी, सामायिक खातेदारांकरिता संमतीपत्र इत्यादी सोबत घ्यावा. आधारकार्डला मोबाइल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे.
नियुक्त नोडल अधिकारी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी अथवा ग्रामपंचायत अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीच्या पिकाचा नोट कॅमेऱ्यात फोटो काढणार आहेत. पंचनाम्यानंतर ग्रामस्तरीय समितीकडून त्याची पडताळणी करण्यात येणार असून. नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी पंचनाम्याचा दैनिक अहवाल सादर करायचा आहे. पंचनाम्याच्या अहवालात शेतकऱ्यांचे गट क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते तपशील आणि मोबाइल क्रमांकाची माहिती सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आठ दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन
पुढील आठ दिवसांत मोहोळ तालुक्यातील सर्व १०४ गावांमध्ये पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष शेतातील पिकांची पाहणी करून नुकसानीची नोंद केली जाणार असून, पंचनाम्याच्या आधारे शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार आहे.