

Mohol Bhambewadi Couple Death
पोखरापूर : नववर्षाच्या सुरुवातीलाच मोहोळ तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली असून पती-पत्नीने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली. भांबेवाडी (ता. मोहोळ) येथे शुक्रवारी ( दि. २) ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची नोंद रात्री उशिरा मोहोळ पोलिसांत करण्यात आली. साजन करीम सय्यद (वय २७), सुलताना साजन सय्यद (वय २३) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, साजन सय्यद व सुलताना सय्यद यांनी भांबेवाडी येथील राहत्या घराचा लोखंडी दरवाजा आतून लावून घेऊन अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. या घटनेची माहिती फरीद सय्यद यांनी शकील सय्यद यांना फोन करून सांगितली.
त्यांनी त्यांच्या नातेवाईकांसह व इतर नागरिकांसमवेत भांबेवाडी येथे जाऊन दरवाजा तोडून त्यांना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची खबर शकील हुसेन सय्यद (रा. वडवळ) यांनी मोहोळ पोलिसांत दिली असून अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहेत.