

मोहोळ : वाळूज (ता. मोहोळ) येथील इंद्रसेन गोरख मोटे यांचा दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झालेला, ‘सोन्या’ नावाचा बैलाने आपल्या मालकाच्या दावणीला अखेरचा श्वास घेतला. सोन्या केवळ एक पाळीव जनावर नव्हते, तर तो इंद्रसेन मोटे या शेतकऱ्याच्या कुटुंबातील सदस्यच होता.
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या सोन्याने आयुष्यभर आपल्या मालकाची निष्ठेने साथ दिली. मालक इंद्रसेनमोटे यांनीही त्याच्यावर अपार प्रेम, माया आणि जपणूक केली. कोणताही भेदभाव न करता, आयुष्यभर सोन्याची काळजी घेत त्याची सेवा केली.सोन्याच्या निधनानंतर मालकाने त्याचा विधीवत अंत्यसंस्कार करून माणुसकीचे जिवंत उदाहरण समाजासमोर ठेवले. ‘तो आमच्यासाठी बैल नव्हता, तर घरातील एक लहान भाऊच होता,’ अशा भावनिक शब्दांत मालकाने सोन्याला अखेरचा निरोप दिला.
मोटे यांच्या घरच्या खिलार देशी गायींचा 2005 साली जन्मलेला हा सोन्या. त्याने सन.2010 सालापासून शेतामध्ये राबण्यास सुरवात केली. शेतामध्ये काम करत असताना अचानक त्याच्या दोन्ही डोळयांतून पाणी गळत असल्याचे इंद्रसेन यांना दिसले. तेव्हा त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी शिनगारे यांना दाखविले असता त्यांनी दोन्ही डोळ्यावर भरपूर प्रमाणात मांस वाढल्याने दोन्ही डोळे काढून ऑपरेशन करावे लागेल. मात्र याला दोन्ही डोळ्यांनी दिसणार नाही, असे सांगितले. डॉ. शिनगारे आणि डॉ. सचिन मोटे यांनी या सोन्या बैलाचे दोन्ही डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर दहा वर्षे झाली सोन्या शेतामध्ये काम करत होता.