

सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे गुरुवार, दि. १६ जुलै रोजी मुंबईला जाण्याआधी शिवस्मारक येथे अर्धा तास थांबले होते. यावेळी संघपरिवारातील प्रमुख, काही संस्थांच्या प्रतिनिधींसोबत संवादात्मक चर्चा केली. शिवस्मारक परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरवर्षी जून, जुलै महिन्यांत मोहन भागवत हे निंबाळ (ता. इंडी, जि. विजयपूर) येथे त्यांचे गुरू गुरुदेव रानडे यांच्या आश्रमात मुक्कामी असतात. या मुक्काम काळात ते साधना करतात. मंगळवार, दि. १४ जुलै रोजी मोहन भागवत हे कर्नाटकचा प्रवास करत निंबाळ येथे मुक्कामी आले होते. त्यानंतर १४ आणि १५ जुलै रोजी निंबाळ येथे मुक्काम करुन १६ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता विजयपूर-सोलापूर मार्गे ते सोलापुरात दाखल झाले.
मोहन भागवत हे दरवर्षी निंबाळला आल्यानंतर सोलापुरात येतात. श्री सिद्धेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. अक्कलकोट रोडवरील बृहन्मठ होटगी येथे भेट देऊन काशी जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामींचे दर्शन घेतले. शिवस्मारक येथे काही मान्यवरांशी संवाद साधल्यानंतर ते पुन्हा सव्वा तीन वाजता रेल्वेने मुंबईकडे मार्गस्थ झाले. दरम्यान टाकळी (दक्षिण सोलापूर) येथून सोलापूरपर्यंत जागोजागी पोलिस बंदोबस्त होता.