

कामती : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत अनेक अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण दिले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या टप्प्यात खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपविरोधी भूमिका घेत वसंतराव देशमुख यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपसमोर एक सक्षम आव्हान उभे राहील आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन त्यांना साथ देतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.
मात्र पुढील काही दिवसांत चित्र झपाट्याने बदलले. महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेत्यांनी भाजपला सहकार्य करण्याचे संकेत दिल्याने मोहिते-पाटील यांच्या राजकीय गणिताला धक्का बसल्याचे दिसून आले. आ. बाबासाहेब देशमुख, आ. उत्तमराव जानकर, आ. नारायण पाटील आणि आ. अभिजित पाटील यांच्यासह काही स्थानिक नेत्यांची भूमिका भाजपसाठी अनुकूल असल्याची चर्चा सुरू झाली. या घडामोडींमुळे सुरुवातीला भाजपविरोधी एकजूट दिसत असताना आता राजकीय समीकरणे बदलल्याचे स्पष्ट होत आहे
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांच्या संख्येचा विचार करता, प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नेत्यांची भूमिका आणि त्यांचे राजकीय निर्णय निवडणुकीचा निकाल ठरविण्यात निर्णायक ठरू शकतात.
मोहिते-पाटलांपुढे आव्हान
भाजपने आपली संघटनात्मक ताकद आणि स्थानिक पातळीवरील संपर्क यंत्रणा सक्रिय केली आहे. दुसरीकडे मोहिते-पाटील यांनीही आपला राजकीय प्रभाव वापरत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र अपेक्षित राजकीय पाठबळ न मिळाल्यास त्यांच्यासमोरील आव्हान अधिक कठीण होऊ शकते.