

मैंदर्गी/दुधनी : अक्कलकोट–गाणगापूर रस्त्यावर मिरज फाट्याजवळ गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास डंपर आणि सिमेंटच्या बल्करची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरचा चालक भिमशा शरणप्पा हरसूर (वय २४, रा.मोघा, ता. आळंद, जिल्हा कलबुर्गी) याचा जागीच मृत्यू झाला आहे.
गुरुवारी पहाटे सुमारे ५.३० वाजता डंपर मिरज फाट्याहून मैंदर्गीकडे जात असताना समोरून वेगाने येणाऱ्या सिमेंटच्या बल्करशी डंपरची समोरासमोर धडक झाली. अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर बल्कर चालक रघुनाथ अर्जुन पापरे (वय ३५, रा. यावली, ता. मोहोळ) हा जखमी झाला असून त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या प्रकरणाची तक्रार मृत चालकाचा भाऊ बसवराज शरणप्पा उर्फ शरणबसप्पा हरसूर यांनी दक्षिण पोलीस ठाण्यात दिली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसे पुढील तपास करीत आहेत.
निकृष्ट दर्जाचा रस्ता – अपघातांचे कारण
अक्कलकोट ते सिन्नूर बॉर्डरपर्यंत बनविण्यात आलेला सिमेंट रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या रस्त्यावर वारंवार दुरुस्ती (टचअप) सुरू असली तरी रस्ता सपाट नसल्याने वाहनांना तीव्र धक्के बसतात व अपघातांची संख्या वाढली आहे.नागरिकांनी शासनाचे लक्ष वेधून घेऊन हा रस्ता नव्याने आणि दर्जेदार पद्धतीने तयार करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.