

माढा : माढा येथील ग्रामीण रुग्णालयात गतवर्षी सिझेरियन प्रसूती झालेल्या एका महिलेकडून रुग्णालयातील वार्डाची स्वच्छता करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अखेर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास मेमाणे, इन्चार्ज सिस्टर तसेच इतर कर्मचाऱ्यांसह एकूण नऊ जणांना निलंबित करण्यात आले असून, आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणत संबंधित पुरावे आणि तक्रारी प्रशासनाकडे सादर केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशीदरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा आणि कर्तव्यात हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. प्रसूतीनंतर विश्रांतीची गरज असलेल्या महिलेकडून रुग्णालयातील वार्ड स्वच्छ करून घेणे ही अत्यंत अमानवी आणि असंवेदनशील बाब असल्याची तीव्र प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त झाली होती. या घटनेनंतर आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना सन्मानपूर्वक आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असताना अशा प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर निलंबनाची कारवाई करत शासकीय रुग्णालयांतील सेवा, शिस्त आणि रुग्णांशी वर्तनाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यावेळी शिवसेनेच्या नेत्या आता खासदार असलेल्या ज्योती वाघमारे यांनी रुग्णालयास भेट दिल्यानंतर स्पष्ट केले होते. दरम्यान, या प्रकरणात पुढील विभागीय चौकशी सुरू असून, चौकशी अहवालानुसार आवश्यक ती पुढील प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.