

सोलापूर : यूपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक पटकाविला. ही परीक्षा आयएएस श्रेणीतील असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे यांची एकमेव निवड झाली आहे. मूळचे सोलापूरचे तसेच सध्या रायगड येथे कार्यरत असलेले अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत.
युपीएससीकडून जून 2025 मध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा झाली होती. 12 जागांसाठी देशभरातील 4 लाख 30 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षेचा लेखी निकाल 9 सप्टेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी वैद्यकीय चाचणी झाली. मंगळवारी (दि. 30) अंतिम निकाल जाहीर झाला. या निकालानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयात तसेच रिझर्व्ह बँकेत मयुरेश वाघमारे यांची निवड होऊ शकते.
मयुरेश वाघमारे यांनी इंग्लंड येथून अॅग्रीकल्चर अॅडव्हान्स्ड इकॉनॉमिक्स या विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे झाले असून संगमेश्वर कॉलेजमध्ये त्यांनी 12 वीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मयुरेश यांचे आजोबा अंगद वाघमारे हे उपजिल्हाधिकारी होते. प्रशासकीय सेवेतील वाघमारे यांच्या कौटुंबिक परंपरेत मयुरेश यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.