

सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मूल्यांकनात सोलापूरच्या 'माविम'ने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला तर शेटफळ (ता. मोहोळ) येथील सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्राची पुणे विभागातील उत्कृष्ट साधन केंद्र म्हणून निवड करण्यात आली.
राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांच्या सन २०२५–२६ मधील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. त्यामध्ये अमरावती जिल्ह्याने प्रथम, सोलापूरने द्वितीय तर वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांनी संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी उत्कृष्ट साधन केंद्र निवडीची प्रक्रियाही पार पडली. त्यामध्ये पुणे विभागात शेटफळ साधन केंद्र उत्कृष्ट ठरले. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी मन्सुर पटेल, विलास बच्चे, सिद्धाराम माशाळे, दीपक टेकाळे, परमेश्वर इंगळे, राजकुमार पवार यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारले. सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने उपाध्यक्षा संगीता सावंत, व्यवस्थापक नितीन साठे, जिल्हा समन्वय अधिकारी मन्सुर पटेल यांनी पुरस्कार स्वीकारला.