

सोलापूर : दुबई फिरण्यासाठी पैसे घेऊन ये, चारचाकी तसेच नवीन घर खरेदीसाठी 25 लाख आण म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला. सुप्रिया महेश सूर्यवंशी (वय 32, रा. गंगानगर, देगाव रोड, सोलापूर) हिला लग्नानंतर तीनच महिन्यांत सासरच्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली.
दुबई फिरण्यासाठी माहेरहून पैसे आण, लग्नात कोणतेही मानपान केले नाही आता चारचाकी आणि नवीन घर घेण्यासाठी माहेरहून 25 लाख रुपये घेऊन ये म्हणत शिवीगाळ करुन मारहाण केली. याबाबत पती महेश, सासू जयश्री, सासरे उद्धव, नणंद मयुरी, नणंदेचा पती केशव, मावस नणंद सुवर्णा (सर्व रा. मालाड, मुंबई) यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
45 लाखांसाठी विवाहितेचा छळ
माहेरहून 45 लाख रुपये आण म्हणत विवाहितेचा छळ करण्यात आला. कोमल अवधूत सूर्यवंशी (वय 32, रा. पत्रा तालीम, उत्तर कसबा, सोलापूर) हिचा सासरच्यांनी मानसिक व शारीरिक छळ केला. मुलाला मोठ्या मुली चालून आल्या होत्या. तू कर्मदरिद्री नशिबात आली. लग्नात मानपान केले नाही. आम्हाला मुलगा पाहिजे होता पण तुला दोन्ही मुली झाल्या. आता नवऱ्याला राहण्यासाठी घर नाही त्यासाठी माहेरहून 45 लाख रुपये आण नाहीतर तुला मुलींसकट हाकलून देतो अशी धमकी दिली. याबाबत पती अवधूत, सासरे शंकर, सासू सुरेखा, नणंद शुभांगी, नणंदेचा पती राहुल, नणंद मुग्धा तिचा पती कन्हैय्या (सर्व रा. जयसिंगपूर, सांगली) यांच्या विरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चारचाकी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल
बुलेटला धडक देऊन एकास जखमी केल्याप्रकरणी चारचाकी वाहनाच्या चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आप्पासाहेब शिवप्पा भगणगेरी (वय 46, रा. लवंगी, ता. द. सोलापूर) यांचा मुलगा नविन हा सोलापूरहून विजापूर रोडकडे बुलेटवरुन निघाला होता. हत्तूर ब्रिजजवळ भरधाव येणाऱ्या चारचाकी गाडीने (एमएच 08 झेड 2292) बुलेटला जोरदार धडक दिली. यामध्ये नविन जखमी झाला. याबाबत चारचाकी वाहनचालका विरोधात विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला.