

सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या मंगळवारी (दि. 15) येथे झालेल्या बैठकीत दोन गटांमध्ये ‘फ्री स्टाईल’ झाली.
दरम्यान, समाजातील ज्येष्ठांनी सर्वांची समजूत काढत फ्री स्टाईल करणार्या दोन्ही गटांना शांत केले. त्यानंतर समाजाची बैठक पार पडली. यामध्ये येत्या शुक्रवारी (दि. 18) अक्कलकोटमध्ये समाज बांधवांचा मोर्चा काढण्याचे तसेच अक्कलकोट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी (दि. 13) अक्कलकोटमध्ये हल्ला झाला. त्यांना काळे फासण्याचा प्रकार घडला. त्या प्रकरणामुळे सोलापुरातील संतप्त समाजबांधवांनी मंगळवारी (दि. 15) सोलापुरात निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक येथील विश्रामगृहात बोलावली. त्यावेळी संभाजी बिग्रेडचे पंढरपुरातील कार्यकर्ते अॅड. रोहित बावडे यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. तेथूनच या बैठकीत राडा सुरू झाला. काही वेळानंतर दोन गटामध्ये बैठकीतच फ्री स्टाईल झाली.
समाजाच्या बैठकीत आरंभी अॅड. बावडे यांना बोलण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, आपण संभाजी ब्रिगेडचे कट्टर कार्यकर्ते असल्याचे सांगत प्रवीण गायकवाड यांचा समर्थक असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितल्याने त्यांना या बैठकीत बोलण्याची संधी देण्यात आली. मात्र, बोलण्याच्या ओघात त्यांनी काही आक्षेपार्ह विधाने करण्यास आरंभ केला. यामुळे बैठकीस उपस्थित तरुण संतप्त झाले. यातील काहीजण अॅड. बावडे यांच्या अंगावर धावून गेले. यातून बैठकीत गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांची एकमेकांमध्ये धक्काबुक्की, हाणामारी सुरू झाली. तब्बल 15 मिनिटे हा प्रकार सुरू होता. अचानक झालेल्या गोंधळामुळे बैठकीच्या संयोजकांची चांगली भांबेरी उडली. अखेरीस घटनास्थळी पोलीस कमांडो पथक आले. गोंधळ घालणार्यांना शांत करण्यात आले. यामध्ये समाजातील ज्येष्ठांनीही मोलाची कामगिरी केली. त्यानंतर समाजाच्या मोजक्या पदाधिाकर्यांची बैठक झाली.