

मंगळवेढा : येथील शनिवार पेठेत गुरुवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिन गॅस कटरच्या साहाय्याने फोडून सात लाख 72 हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे चोरीचा प्रकार सुरू असतानाच पोलिसांचे गस्ती पथक घटनास्थळी पोहोचले.
मात्र, अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी भरधाव कारमधून पलायन केले. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्धरीत्या गॅस कटरचा वापर करून एटीएम मशिनचा लोखंडी भाग कापला. आतील रोकड आपल्या ताब्यात घेतली. याचवेळी पोलिसांचे गस्ती पथक नेहमीप्रमाणे या भागातून जात असताना त्यांना एटीएम सेंटरजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. पोलिसांची गाडी जवळ येत असल्याचे पाहताच दरोडेखोरांनी तातडीने रोकडसह बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये उड्या मारल्या आणि पळ काढला.
पोलिसांनी या कारचा पाठलाग सुरू केला. मात्र, पहाटेची वेळ आणि रस्त्यांवरील शुकशुकाट याचा फायदा घेत चोरट्यांनी कार भरधाव वेगाने पळवली. तसेच अंधाराचा आणि वेगाचा फायदा घेत ते पसार होण्यात यशस्वी झाले. प्राथमिक तपासात सात लाख 72 हजार रुपये चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर आणि पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा केला असून, तपास सुरू केला आहे. पोलिस पाटील आणि ग्रामरक्षक दलांना या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सतर्क राहण्याचे आदेश दिले.