

भंडारकवठे : मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे काल शनिवारी रात्री अचानकपणे सुटलेल्या वादळी वाऱ्यात वीज पडून एकाचा बैलाचा मृत्यू झाला असून, शेतातील पिकांचे व वस्तीवरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री आठच्या सुमारास पाऊस, गारपीट व प्रचंड वेगाच्या वाऱ्याने नागरिकांची धावपळ झाली. विजांच्या गडगडाटाने पाऊस झाला. येथील बाशाभाई शेख यांच्या शेतातील बैलावर वीज कोसळून बैलाचा मृत्यू झाला.
अचानकपणे रात्री आठच्या दरम्यान सुटलेल्या वारा व वादळाने शेतात वस्ती करून राहत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच, महावितरणच्या विद्युत वाहीन्यांचे खांबही मोडून पडले असून काही निम्यावर वाकलेले आहेत. यामुळे, काही गावात अंधार होते. यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. या वारा वादळीच्या पाऊसाने फळबागांना फटका बसला आहे. काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून यामुळे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे.