

करमाळा : तालुक्यासह ग्रामीण भागात शेतातील विहिरीजवळील तसेच नदीकाठच्या पाणीपुरवठा परिसरातून शेतीपंपाच्या मोटारी चोरीला जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेष म्हणजे या चोरीच्या घटना छोट्या-मोठ्या टोळ्यांकडून नव्हे तर संघटित आणि मोठ्या रॅकेटकडून केल्या जात असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.
माहितीनुसार, अनेक चोरटे रात्रीच्या वेळी पाण्याच्या मार्गाने बोटीच्या सहाय्याने नदीकाठच्या मोटारींपर्यंत पोहोचतात. मोटार चोरी करून अथवा त्यातील कॉपर वायर काढून ते पुन्हा पाण्याच्या मार्गाने पसार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. उजनी जलाशय परिसरात अशा घटनांचे प्रमाण अधिक असून सीना नदी परिसरातही काही प्रमाणात चोरीच्या घटना घडल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात मागील काही वर्षांपासून मोटार चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शेतीच्या पाणीपुरवठ्यावरही गंभीर परिणाम होत आहे. अनेक शेतकऱ्यांना नवीन मोटार बसविण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यानंतर पुन्हा चोरी होण्याची भीती कायम असल्याने शेतकरी मानसिक तणावाखाली असल्याचे चित्र आहे.
बऱ्याच वेळा चोरटे मोटारीतील कॉपर वायर काढून मोटार जागेवरच टाकून जातात. विक्री करणाऱ्यांना त्यातून मर्यादित फायदा होत असला तरी शेतकऱ्यांचे मात्र लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. 15 एचपीसारख्या मोठ्या मोटारींमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपर असल्याने या चोऱ्यांमागे संघटित भंगार साखळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अनेक शेतकरी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांची तक्रार गुन्हा दाखल न करता केवळ एनसी म्हणून नोंदवली जात असल्याचीही नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले असले तरी अपेक्षित तपास न झाल्याने गुन्हेगार अद्याप मोकाट असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी जोर धरत आहे.