Padmavati Devi : सोलापूरहून जाणार पद्मावतीदेवीला माहेरची साडी

पद्मशाली बांधवांना ब्रह्मोत्सवात १७ वर्षापासून लाभतोय बहुमान
Padmavati Devi
Padmavati Devi
Published on
Updated on

सोलापूर : तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरास यंदाही नऊ डिसेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावतीदेवीला माहेरची साडी अर्पण करणार असल्याची माहिती श्री पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भगवान व्यंकटेश्वर अर्थात बालाजी यांच्या पत्नी श्री पद्मावतीदेवी या पद्मशाली समाजाच्या कन्या आहेत. त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावतीदेवीला साडी चोळी, ओटीभरणा करण्याचा बहुमान पद्मशालीवंशीयांना कायम आहे. तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात गत १७ वर्षांपासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना पद्मावतीदेवीला माहेरची साडी (पुट्टींटी पट्टूचिरा) अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे.

यंदाच्या उत्सवासाठी सोलापुरातील समाजबांधव हे ८ डिसेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत. यंदाच्या ब्रह्मोत्सवात साडी अर्पण कार्यक्रमाचे प्रमुख यजमान पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश कोठे हे आहेत.

या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पद्मशाली बांधवांसाठी प्रती व्यक्ती ४ हजार १ रुपये देणगी शुल्क आहे. यामध्ये साडी अर्पण सहभाग, प्रवास, निवास, भोजन, बालाजी दर्शन आदी व्यवस्था केली जाणार आहे. या पत्रकार परिषदेला प्रा. व्यंकटेश पडाल, नागेश सरगम, रामचंद्र जन्नू, गोपी वडेपल्ली, दामोदर पासकंटी, व्यंकटेश रच्चा, पंडित वेणुगोपाळ जिल्ला आदी उपस्थित होते.

पद्मावतीदेवी पद्मशाली असल्याचे दाखले

भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी महालक्ष्मी स्वरूपिणी देवी पद्मावती या स्वतः ‘ मी पद्मशाली‘ असा गर्भगृहातून आवाज दिल्याचे पुरातन दाखले आहेत. त्यामुळे पुरातन काळापासून पद्मावतीदेवीला साडी चोळी , ओटीभरणा करण्याचा बहुमान पद्मशालीवंशीयांचा कायम आहे. तशी नोंद ताम्रपटात असून तो ताम्रपट आजही तिरुपती देवस्थानाकडे उपलब्ध आहे, हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news