

दीपक शेळके
सोलापूर : ऐकावे ते नवलच असल्याची प्रचिती शहरातील पुतळ्यांच्या मजबुतीकरणाच्या कामाबाबत प्रत्ययास येत आहे. म्हणे आखाती युद्धाचा थेट फटका सोलापुरातील म. गांधी पुतळ्याच्या दुरुस्तीकरणाच्या कामालाही बसला. म. गांधी पुतळ्यावरील खराब झालेले कलर कोटींग रिमूव्ह करण्यासाठी चक्क सिलिंडरच मिळत नसल्याने या पुतळ्याचे काम रखडल्याची माहिती पुढे आली आहे. माजी उपपंतप्रधान यशवंतरावांच्या पुतळ्याचे काम चक्क बजेट अभावी रखडल्याचीही माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरण आणि दुरुस्तीची कामे सध्या सोलापूर महानगरपालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. काही ठिकाणी निधीअभावी तर काही ठिकाणी साहित्य टंचाईमुळे कामे रखडल्याचे चित्र समोर आले आहे. म. गांधी पुतळ्याच्या चष्म्याची काडी तुटल्याने नवीन चष्मा बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या पुतळ्याचा जुना रंग काढण्यासाठी आवश्यक असलेला गॅस कटरचा सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने उर्वरित काम रखडले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅस टंचाई असल्याने सिलेंडर मिळण्यात विलंब होत असल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले.
माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या सात रस्त्यावरील पुतळ्याचे काम बजेटअभावी रखडले आहे. धोकादायक झालेला जुना चबुतरा काढून नव्याने बांधण्यात आला आहे. त्यावर पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळ्याचे रंगकाम आणि अन्य प्राथमिक कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, तळभागातील फरशीकरण आणि अन्य कामांसाठी सुमारे सहा लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. पुतळ्याचा परिसर नव्या झोन कार्यालयाच्या हद्दीत गेल्याने निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज आणि कोंतम चौकातील महात्मा बसवेश्वर पुतळ्यांची दुरुस्ती व सुशोभीकरणाची सर्व कामे महापालिका प्रशासनाने पूर्ण केली आहेत.