

सोलापूर : महात्मा बसवेश्वर यांच्या जंयत्तीनिमित्त अक्षय तृतीयेच्या दिवशी बुधवारी (दि. 30) जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने मिरवणूक काढली जाणार आहे. याची सुरुवात बाळीवेस येथील मल्लिकार्जून मंदिरापासून सायंकाळी सहा वाजता होणार असल्याची माहिती महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जयंत्ती उत्सव महामंडाळाचे अध्यक्ष मनीष काळजे यांनी दिली.
या मिरवणुकीची सुरुवात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख, आ. दिलीप सोपल, आ. समाधान आवताडे, आ. राजू खरे, आ. देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार उपस्थित राहतील.
मध्यवर्ती महामंडळाच्या मुख्य मिरवणुकीत 25 पेक्षा जास्त मंडळांचा सहभाग असेल. सर्व मंडळांना आपापल्या हद्दीतील पोलीस ठाण्यांकडून परवानगी दिली आहे. या वर्षी बसवेश्वर चौक (सर्कल), कोंतम चौक येथे मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. ते यंदाचे प्रमुख आकर्षण आहे. यंदाच्या वर्षी मध्यवर्ती मंडळाच्या वतीने पारंपरिक पद्धतीची सांस्कृतिक परंपरा जपणारी मिरवणूक काढण्यात येईल. प्रारंभी, मध्यवर्ती महामंडळाच्या मानाच्या पालखीची मिरवणूक निघेल. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल. चाटी गल्ली येथे मध्यवर्तीच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळातील अध्यक्ष आणि पदाधिकार्यांचे स्वागत केले जाणार आहे. मध्यवर्ती उत्सव मंडळाच्या मिरवणूक मार्गातील सर्व अडथळे महापालिकेकडून काढले आहेत.