

कुर्डूवाडी : ऑनलाईन लिंक, जनगणना, एसआयआर, मतदार यादी पुनरीक्षण, बीएलओची विविध कामे आणि खासगी संस्थांचे अवांतर उपक्रम यामुळे अध्यापनाचा वेळ वाया जात आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी १० ते ५ या वेळेत अशैक्षणिक कामांना स्पष्ट नकार देत माढा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी ‘आता शाळेत आलोय विद्यार्थ्यांसाठी, ऑनलाईन कामांसाठी नाही!’ अशी स्पष्ट भूमिका ९ ऑगस्ट या क्रांती दिनी घेतली आहे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता केंद्रस्थानी ठेवत अशैक्षणिक व अवांतर ऑनलाईन कामांना विरोध करण्याचा निर्धार माढा तालुका सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला.
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, कुर्डुवाडी येथे झालेल्या या बैठकीत विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि बहुसंख्य प्राथमिक शिक्षक उपस्थित होते. ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून शिक्षकांनी एकजुटीने ही भूमिका जाहीर केली.
माढा तालुका शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत राज्यासाठी दिशादर्शक राहिला आहे. मात्र, शिक्षकांना सातत्याने देण्यात येणारी अशैक्षणिक कामे, विविध ऑनलाइन लिंक, खासगी संस्थांचे उपक्रम, जनगणना, एसआयआर मतदार यादी पुनरीक्षण आणि बीएलओची वर्षभरातील विविध कामे यामुळे शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ कमी होत असल्याची नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा बळी देऊन कोणतीही अशैक्षणिक कामे केली जाणार नाहीत, अशी भूमिका शिक्षकांनी घेतली. यापुढे शाळेच्या सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत प्रशासनाने दिलेले कोणतेही अवांतर ऑनलाइन काम मोबाईलवर न करण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान, शिक्षकांच्या अडी-अडचणींबाबत प्रशासनाला निवेदन देऊन समन्वयाने मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, प्रशासनाकडून चुकीची अथवा आडमुठी भूमिका कायम राहिल्यास आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.