

सोलापूर : राज्य शासनाने अरण (ता. माढा) येथील श्री संत सावता महाराज संजीवन समाधी स्मारकासाठी 150 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील 89.07 कोटी निधीला प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. या स्मारकाच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. 24 ऑगस्ट रोजी भूमिपूजन करण्याचे नियोजित आहे. शासकीय यंत्रणांनी यासाठी आवश्यक प्रक्रिया गतीने पूर्ण करून घ्याव्यात, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
सोमवारी (दि. 6) नियोजन भवनातील सभागृहात श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी व श्री महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक आढावा बैठक पालकमंत्री गोरे यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, वसेकर महाराज, माढा प्रांताधिकारी ज्योती आव्हाड आदी उपस्थित होते.
श्री बसवेश्वर स्मारकासाठी वास्तुविशारदची नियुक्ती
मंगळवेढा शेजारील चोखामेळा नगर हद्दीतील कृष्ण तलावा शेजारील जागा श्री महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी देण्याबाबत प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आला. यातील किमान 15 एकर जागा स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी, कृष्ण तलावाच्या सुशोभीकरणाचाही प्रस्ताव आराखड्यात घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. या स्मारकाचा आराखडा करण्यासाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करण्याबाबत पालकमंत्री गोरे यांनी सूचना केली.