

पिलीव : पिलीव पंचक्रोशीतील पिलीव येथील हरी गजानन पाटील यांच्या माडग्याळ जातीच्या मेंढ्यांची विक्री तीन लाखात करण्यात आली आहे. तर मेंढी ७७ हजार रुपयांना विक्री झाली आहे.
सोमवार, दि. १२ रोजी पिलीव येथील मेंढपाळ हरी गजानन पाटील व रवींद्र हनुमंत घुले (बारामती) यांना उत्तम प्रतीची जनावरे सांभाळण्याची आवड आहे. माडग्याळ जातीची मेंढरे व बकरे मोठ्या प्रमाणात सांभाळली जात आहेत. या माडग्याळ जातीच्या मेंढरांची पिलीव येथे विक्रमी दराने विक्री झाली.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पुळकोटी गावचे रहिवाशी बजरंग हनुमंत सातपुते यांनी खरेदी केली आहे. माडग्याळ जातीचा बकरा तीन लाखात तर दहा मेंढ्या प्रत्येकी ७७ हजार रुपये प्रमाणे खरेदी केल्या आहेत.
या खरेदी-विक्रीचा व्यवहार पिलीवचे माजी जि. प. सदस्य गणेश पाटील, अमोल पाटील, सुनील जरग, विकास पाटील, विजय पाटील यांच्या उपस्थितीत झाला. दुष्काळी परिस्थितीत ही माडग्याळ जातीच्या बकऱ्यांचा व मेंढ्याचा तळहातावरील फोडासारखा सांभाळ केला. मोठी किंमत आल्याचे मेंढपाळ हरी पाटील यांनी सांगितले.