

सोलापूर : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत लिंगायत स्मशानभूमी श्री सिद्धेश्वर देवस्थानला देण्याच्या विषयावरून भाजपमधील सत्ताधारी दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात होटगी मठाने सातत्याने पाठपुरावा करत असताना प्रशासनाचा प्रस्ताव जाणून-बुजून महापौर आणि सभागृह नेते तसेच नगरसेवकांनी रद्द करत नव्याने दाखल झालेला सभासद प्रस्ताव मंजूर केल्याने सत्ताधारी पक्षातील दोन गट आमने-सामने आले आहेत. हे सर्व पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. देवेंद्र कोठे यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याने या घटनेचे तीव्र पडसाद आता लिंगायत समाजामध्ये उमटले आहेत.
या प्रकरणात आता काशीजगद्गुरूंनी लक्ष घातले असून सर्व धर्मगुरू तसेच लिंगायत समाजाच्या प्रतिष्ठित व्यक्तींची होटगी मठात बैठक बोलावली आहे. या बैठकीत पालकमंत्री गोरे, महापौर विनायक कोंड्याल, आ. कोठे आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांच्या विरोधात आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत लिंगायत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो निर्णय घेतला आहे, यावर विचार विनिमय करण्यासाठी काशीच्या जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी आ. विजयकुमार देशमुख यांच्यासमवेत सर्व शिवाचार्य, नगरसेवक व लिंगायत समाजाची बैठक येत्या तीन ते चार दिवसांत बोलविण्यात येणार आहे.
श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीला अक्कलकोट रोड स्मशानभूमी देखरेख आणि चालवण्यासाठी देण्याचा महापालिकेने निर्णय घेतला. प्रशासकीय काळात आयुक्तांनी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीस लिंगायत स्मशानभूमीची देखरेख करण्यासाठी इच्छुक आहात का, अशी विचारणा केली. त्यानंतर आयुक्तांसोबत सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीची एक बैठक ही झाली. या बैठकीनंतर सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने महापालिकेस स्मशानभूमी चालवण्यासाठी असमर्थता दाखवली. 25 जुलै 2025 रोजी श्री होटगी मठ संस्थेच्यावतीने महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन ही स्मशानभूमी देखभाल व व्यवस्थापनासाठी आर्थिक भार उचलून चालवण्यास घेण्यास तयार असल्याचे महापालिकेला कळवले. प्रशासन काळात या संस्थेला अक्कलकोट रोड शांतीधाम येथील दोन एकर जागा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. लोकप्रतिनिधींचे राज्य येतात स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे लिंगायत स्मशानभूमीसाठी दोन एकर जागा श्री सिद्धेश्वर मंदिर समितीस देण्याचा सभासद प्रस्ताव दिला. हा विषय पत्रिकेवर येताच नगरसेवक शिवानंद पाटील यांनी यावर आक्षेप घेत हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी केली. दोन्ही संस्थेच्या प्रमुखांना तसेच तीनही आमदारांना विश्वासात घेऊन या विषयावर निर्णय घेण्याचा ठरले असतानाही सर्वसाधारण सभेमध्ये महापौरांनी प्रशासनाने मंजूर केलेला ठराव रद्द करत अक्कलकोट रोड स्मशानभूमीची जागा सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीला देण्याचा निर्णय घेतला.