

सोलापूर : लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न सध्या चांगलाच पेटला असून या समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जागा न मिळाल्याचा विषय नाही, मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. देवेंद््र कोठे यांच्या सांगण्यावरून आ. विजयकुमार देशमुख यांच्या पत्राला आणि होटगी मठाला जी वागणूक महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली, याच्या निषेर्धा 28 मार्च रोजी होटगी मठात काशी पीठ जगदगुरूंच्या अध्यक्षतेखाली सर्व धर्मगुरू, आ. विजयकुमार देशमुख, समाजातिल प्रतिष्ठीत व्यक्तीच्या उपस्थित बैठक होणार आहे. या बैठकीत लिंगायत समाजाच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
स्मशानभूमीसाठी जागा मिळत नसल्यामुळे समाजातील संताप उफाळून आला आहे. विशेषतः आ. विजयकुमार देशमुख यांनी पाच वेळा पत्रव्यवहार करूनही या विषयावर ठोस निर्णय न घेतल्याने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा आरोप आ. देशमुख गटाच्या नगरसेवकांचा आहे. महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सभागृहात घेतलेल्या भूमिकेबद्दल लिंगायत समाजामध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामागे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आ. देवेंद्र कोठे यांच्या सूचनेनुसार ही वागणूक दिल्याचा आरोपही समाजातील काही घटकांकडून होत आहे.
अक्कलकोट रस्त्यावरील जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी मिळावी, यासाठी होटगी मठाने सहा महिन्यांपासून प्रशासनासोबत पत्रव्यवहार सुरू आहे. प्रशासकीय काळात याबाबत ठराव देखील झालेला आहे. असे असताना देखील महापौरांनी आडमुठी भूमिका घेतली. जुळे सोलापुरातील स्मशानभूमी अस्तित्वातच नाही. या भागात जागा देखील नसताना केवळ दिशाभूल करून समाजामध्ये फुट पाडण्याच्या दृष्टिकोनातून महापौर विनायक कोंड्याल यांनी जुळे सोलापूर स्मशानभूमीची जागा होटगी मठाला देण्याची घोषणा करून समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप समाजातील काही घटकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर 28 मार्च रोजी होटगी मठात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस काशी पिठाचे जगद्गुरू, विविध मठांचे धर्मगुरू, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि आ. विजयकुमार देशमुख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सभागृहातील पदाधिकारी आणि सत्ताधारी गटाकडून मिळालेल्या वागणुकीचा निषेध नोंदवून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.