

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून शिवसेनेकडून रमेश बारसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मनसेचे दिलीप धोत्रे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख, एमआयएमच्या वाहिदा शेख, भाजपचे भीमा आसादे यांनी अर्ज नेले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शनिवार, 30 मे आणि सोमवार, दि. 1 जून ही शेवटची तारीख आहे.
भाजप, काँग्रेसचा उमेदवार ठरलेला नाही. आतापर्यंत 44 अर्जांची विक्री झाली असून, रमेश बारसकर यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. या निवडणुकीसाठी बॅलेट पेपरवर पसंती क्रमानुसार मतदारांचे मतदान घेण्यात येणार आहे. दि. 25 मे ते 1 जून या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 ते 3 यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
2 जून रोजी प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. 4 जूनपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. 18 जून रोजी मतदान व 22 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पूर्ण करण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 68, महानगरपालिकेचे 111, नगर परिषदेचे 426 असे एकूण 616 मतदार या निवडणुकीसाठी असणार आहेत.