

सोलापूर ः मोहोळ तालक्यातील खवणी येथे अवैध दारू वाहतुकीवर सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल 19 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. नराज अविनाश भोसले (रा. पोखरापूर, ता. मोहोळ), ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ व अमर मोहन गिड्डे (रा. मोडनिंब, ता. माढा) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर व त्यांचे पथक मोहोळ पोलिस ठाण्यात पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की, खवणी येथील नागनाथ नर्सरीजवळ काहीजण विनापरवानगी दारूची वाहतूक करीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी तीघे संशयीत एका वाहनातून दुसऱ्या वाहनात अवैध दारू उतरवत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी दारू, विविध कंपनीचे 90 मिलीचे 77 बॉक्स, दोन चारचाकी आणि दोन दुचाकी गाड्या असा 19 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अमित बाबर, पोलिस कॉन्स्टेबल हरिदास थोरात, घाडगे, दोरकर, शिंपाळे, पवार यांनी पार पाडली.