

मोहोळ शहर : ओबीसी आरक्षण प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे मोहोळ तालुक्यातील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले असताना काही तरुणांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. हाके हॉटेलातून बाहेर पडत असताना त्यांच्या वाहनासमोर काही जण उभे राहिल्याने वाद वाढला. यावेळी हाके समर्थक, संबंधित तरुण आणि पोलिसांमध्ये काही काळ धक्काबुक्की झाली. मोहोळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
हाके यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित तिघे हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच ते व्हिडीओ तयार करीत होते. परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यासोबत असलेल्या पोलिस अधिकारी व एसपीओ कर्मचाऱ्यांनी संबंधितांना समजावून सांगून बाहेर काढले.
त्यानंतर हाके व त्यांचे सहकारी जेवण करून बाहेर पडत असताना संबंधित व्यक्ती त्यांच्या वाहनाजवळ बसल्याचे हाके यांनी सांगितले. वाहन निघत असताना ते वाहनाच्या आडवे उभे राहून पुन्हा हुज्जत घालण्याचा आणि हल्ल्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा हाके यांनी केला. त्यामुळे तेथे उपस्थित पोलिस अधिकारी व हाके समर्थकांनी हस्तक्षेप केला.
हुज्जत घालणारे तिघेही चाकूरचे
या घटनेनंतर मोहोळ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याचे हाके यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचेही ते म्हणाले. तसेच ते लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील रहिवासी असल्याचे सांगत होते, अशी माहिती हाके यांनी दिली. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय, संबंधित व्यक्तींचा हाके यांच्याशी नेमका वाद कशावरून झाला आणि हल्ल्याचा प्रयत्न झाला का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.