

सोलापूर : शहरातील एका वकिलाने पत्नीचा चाकूचा वार करून खून केला आणि स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 18) साडेअकराच्या सुमारास घडली. प्रशांत राजहंस असे त्या पतीचे नाव आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास प्रशांत राजहंस हे स्वतः फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांनी पोलिसांना घडलेली घटना सांगितली. माझी पत्नी भाग्यश्री आणि माझे भांडण झाल्याने चाकूने गळ्यावर वार करून तिचा मी खून केल्याचे त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांना सांगितले. पोलिसांनी प्रशांत राजहंस यांना ताब्यात घेतले. तातडीने पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. वरिष्ठ अधिकारीही तात्काळ घटनास्थळी हजर झाले. प्रशांत राजहंस हे व्यवसायाने वकील असून, त्यांनी स्वतः आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिल्याने सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे.
तेथे बेडरूमधील बेडवर भाग्यश्री या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, बाजूलाच चाकू पडला होता. त्यांना त्वरित सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
भाग्यश्री हिचा भाऊ रत्नदीप विद्याधर भोसले ( वय 37, रा. मिलिंद नगर, बुधवार पेठ, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भाग्यश्री ही मंगळवेढा येथे जाण्यासाठी तयार नव्हती तसेच प्रशांत याला घर बांधण्यासाठी पैसे न दिल्याने तिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक दराडे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.