

कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील लऊळ, उजनी (मा )., पडसाळी व भुताष्टे या चार गावासाठी भेडसावणारा विजेचा प्रश्न आता संपुष्टात आला असून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी व योजनेच्या ऊर्जा प्रकल्प अंतर्गत विद्युत सब स्टेशन उभारणीस लऊळ येथे अधिकृत जागा उपलब्ध झालेली असून याबाबतीचा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त झाला आहे त्यामुळे आगामी थोड्याच कालावधीत या ठिकाणी विद्युत सबस्टेशन प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती माढा तालुक्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेली आहे.
लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे हस्ते लऊळ येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन-उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजीत सिंह शिंदे यांनी दिली आहे.
रणजितसिंह शिंदे म्हणाले, माढा तालुक्यातील लऊळ, पडसाळी, भुताष्टे व उजनी (मा.) या गावांना सीना माढा सिंचन योजनेचे मुबलक पाणी उपलब्ध असून देखील कमी दाबाचा, मोजक्याच वेळेत व खंडित वीज पुरवठा होत असल्यामुळे हजारो एकरातील बागायती पिके पाण्याअभावी जळून जात होती व त्यामुळे या संपूर्ण परिसरातील शेकडो शेतकरी नाराज होत होते. विशेष असे की लऊळ हद्दीतील मोठी जागा अनेक वर्षांपासून महाझिन्को कंपनीकडे प्रकल्प उभारणीस देण्यात आली होती परंतु या ठिकाणी काहीही प्रगती झाली नाही व शासनाने राज्यातील असे प्रोजेक्ट रद्द केले. यातील जागा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत वीज केंद्र उभारण्यासाठी मिळावी म्हणून माजी आमदार बबन दादा शिंदे यांनी मागील तीन वर्षापासून मंत्रालयातील मुख्यमंत्री यांचे सहित संबंधित कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
सहा महिन्यांपूर्वी बबन दादा शिंदे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत गेले आहेत परंतु तेथून देखील दादांनी मुख्यमंत्री व संबंधित इतर मंत्री महोदय व अधिकारी यांना या ठिकाणच्या विजेच्या गरजेची वस्तुस्थिती जन्य माहिती कळवून याबाबतचा सातत्याने पाठपुरावा चालूच ठेवला होता. कार्यकर्त्यांना वेळोवेळी सहकार्य दिले जात होते. त्यामुळे वस्तुस्थितीचा अभ्यास करून जिल्हाधिकारी यांनी मौजे लऊळ येथील शासकीय जमिनीतील गट नंबर 715 मधील 11 हेक्टर 98 आर (अंदाजे 30 एकर) जागा सौर ऊर्जा वहिनी प्रकल्पास देण्याचा आदेश काढला. लवकरच याची कार्यवाही पूर्ण होणार आहे. येत्या उन्हाळी हंगामात या चारही गावातील बागायती शेतीस नियमित अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा निश्चित मिळेल याबद्दल विश्वास देतो.