

करमाळा : शासनाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने काढलेल्या परिपत्रकानुसार प्रत्येक छोट्या मोठ्या रुग्णालयात दवाखान्यात डॉक्टरांनी ‘केवायडी’चे क्यूआर स्कॅनर लावणे सक्तीचे असून त्याची अंमलबजावणी तत्काळ करून बोगस डॉक्टरांना आळा घाला, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शिष्टमंडळाने केली आहे. सदरचे निवेदन उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतीजा वेदपाठक तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश काटकर यांना दिले आहे.
ग्राहक पंचायतीने दिलेले निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदच्या नियमानुसार प्रत्येक डॉक्टरने आपल्या क्लिनिकमध्ये अधिकृत ‘केवायडी’ क्यूआर कोड दर्शनी भागात लावण्याचे शासनाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी) ११ फेब्रुवारी २०२५ रोजी परिपत्रक काढलेले आहे. त्याची अद्यापही अनेक शहरात व ग्रामीण भागातील दवाखान्यात अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे खरे व बोगस डॉक्टर ओळखण्यास नागरिकांना अडचण होत आहे. बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सगळीकडे सुरू आहे. त्याला आळा घालणे फार गरजेचे आहे.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता बंडगर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा प्रबोधन प्रमुख भीष्माचार्य चांदणे, जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाच्या सदस्या तथा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा माधुरी परदेशी, तालुका अध्यक्ष ब्रह्मदेव नलवडे, सचिव अजीम खान, सदस्य भीमराव कांबळे, मीनाक्षी जाधव, चक्रधर पाटील, नितीन शिंदे आदी ग्राहक पंचायतीचे सदस्य उपस्थित होते. करमाळा तालुक्यातील बोगस डॉक्टरांवर केलेल्या कारवाईची माहिती व यादी ग्रामपंचायतला माहितीस्तव देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.