

मोडनिंब : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून केलेला कुर्डूवाडी-पंढरपूर रस्ता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. बावी येथील रखडलेल्या कामांबाबत आंदोलने करूनही प्रलंबित होते. याबाबत दै. ‘पुढारी’मध्ये 30 मे रोजी वृत्त प्रसिध्द होताच प्रशासन खडबडून जागे झाले. याची त्वरित दखल घेत कुर्डूवाडी-पंढरपूर बावी येथील या रस्त्याच्या कामाबाबत गंभीरता बाळगत बावी येथे जाऊन रस्त्याचे मुरमीकरण करण्याची प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली. नागरिकांसह वारकर्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पंढरपूरच्या वारीनिमित्त या मार्गावरून वाहतूक वाढणार असल्याने रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रस्त्याचे ठेकेदार व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांना दिले. त्याप्रमाणे रस्ते विकास महामंडळ व माढा तहसीलदार संजय भोसले, मोडनिंब मंडळ अधिकारी बिभीषण वागज, बावी ग्राम महसूल अधिकारी शंकर मोहिते, शिवाजी इंगोले, मोहसीन हेड्डे, महसूल सहाय्यक हनुमंत सूर्यवंशी, वाहन चालक राजेश पाटील, ग्राम महसूल सेवक प्रशांत गाडे व पोलिस खात्यातील एपीआय नेताजी बंडगर, एएसआय प्रवीण दराडे, पोलिस हवालदार जाधव, निचळ, घुगे, कॉन्स्टेबल बागल, शिंदे, पोलिस हवालदार आगवणे, पोलिस पाटील अनिल मोरे यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.
कुर्डूवाडी-पंढरपूर बावी येथील 200 फूट लांबीचा रस्ता बनवलेला नसून रस्त्याच्या मध्यभागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे सिमेंट रस्त्यावरून वेगाने येणार्या वाहनधारकांचे नियंत्रण सुटते. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. गतिमान वाहन एखाद्या खड्ड्यात अडकून किंवा उडून समोरून येणार्या वाहनाला धडकल्याने अनेक अपघात झाले आहेत. मुख्य रस्त्यावर एक ते दीड फूट खोल खड्डे पडले असून ते वाहनचालकांसाठी जिवावर बेतणारे ठरत आहेत. ठेकेदाराने या भेगांमध्ये सिमेंट भरून तात्पुरती मलमपट्टी केली आहे. रस्त्यावर विविध छोटे मोठे पूल बांधलेले आहेत. कुर्डूवाडी शेजारील पुलाला तर भगदाड पडले आहे, याठिकाणी हा ठेकेदार वारंवार येऊन भगदाड बुजविण्याचा प्रयत्न करतो. सर्वच पूलावरून जड वाहने जाताना गाड्यांचा मोठा आवाज येतो. तरी राज्य रस्ते विकास मंडळाने त्याठिकाणी माहिती फलक व गतिरोधक करण्याबाबत प्रवाशांची मागणी होत आहे.