

सोलापूर/कुर्डुवाडी : कुर्डूवाडी शहरात मेफेड्रोन ड्रग्ज (एमडी) विक्रीसाठी आणलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व कुर्डूवाडी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली. आरोपीकडून ६३ ग्रॅम एमडी, रोख रक्कम, मोबाईल फोन व वाहन असा एकूण सुमारे ९ लाख ८९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोहेल अमर मुलाणी (वय २८, रा. खाटी गल्ली, कुर्डूवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सोहेल मुलाणी हा करमाळा रोडवरून चारचाकी गाडीत कुर्डूवाडीत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणत आहे. त्यानुसार जगताप यांनी पोलिस निरीक्षक अतुल मोहिते व गुन्हे शाखेचे सहा. पोलिस निरीखक भीमगौडा पाटील यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कुर्डुवाडी शहराजवळील बौद्ध विहाराजवळ संशयित आरोपी सोहेल मुलाणी येताच त्याला पकडण्यात आले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ६३ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. जप्त केलेल्या एमडी ड्रग्जची किंमत सुमारे १ लाख ८९ हजार रुपये आहे. याशिवाय आरोपीकडून गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी व मोबाईल फोन असा सुमारे ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सोहेल अमर मुलाणी याच्या विरोधात कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.