

कुर्डुवाडी : येथील गीताबाई मळा परिसरात पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून १ लाख १५ हजार रुपये किमतीचा २ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक विजय घोगरे यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जितेंद्र ऊर्फ जितू गायकवाड (वय ३५), किशोर उर्फ आप्पा ढवळे (३०) दोघे रा. गीताबाईचा मळा, कुर्डुवाडी व निखिल भाकरे (२१, रा. सातव कॉलनी, कुर्डुवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
रात्री १० वा. सुमारास गीताबाई मळा परिसरात गांजाची साठवणूक व बेकायदेशीर विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवार, दि. २७ रोजी मध्यरात्री पो.नि. अतुल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अरविंद गटकूळ आणि त्यांच्या पथकाने फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाड टाकली.
संशयितांच्या ताब्यातून खाकी आणि गुलाबी रंगाच्या प्लास्टिक पिशवीत भरलेला उग्र वासाचा गांजा जप्त करण्यात आला. पंचांसमक्ष वजन केले असता एकूण २ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला, ज्याची बाजार भावाप्रमाणे अंदाजे किंमत १,१५,००० रुपये आहे. फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत पंचांसमक्ष कागदी लेबल व लाखाचे सील लावून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.