

सोलापूर : कुंभारी विडी घरकुल परिसरातील घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले. सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ३५ गुन्ह्यांमध्ये नोंद असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून १० ग्रॅम सोन्याचे व ९० ग्रॅम चांदीचे दागिने असा सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांचे पथक मोहोळ येथील शिवाजी चौकात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मोहोळ तालुक्यातील ढोकबाभूळगाव येथे सापळा रचण्यात आला.
यावेळी बंडू उर्फ बंदेनवाज मधुकर पवार (वय २५, रा. ढोकबाभूळगाव, ता. मोहोळ) याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, कसून चौकशीत त्याने तीन महिन्यांपूर्वी साथीदार उमेश प्रकाश काळे (रा. मलिकपेठ, मोहोळ) याच्यासह कुंभारी येथे दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. बंडू पवार याच्यावर मालमत्तेविरोधातील ३५ गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, शशिकांत कोळेकर, नागेश कोणदे, मोहन मनसावाले, दिनेश पवार, प्रमोद शिंपाळे, अक्षय डोंगरे, योगेश जाधव, जगदीश राठोड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, सतिष बुरकुल यांच्या पथकाने केली.