Solapur mayor election: महापौरपदी कोंड्याल, उपमहापौरपदी देवकर अविरोध

शिवसेना, एमआयएमने उमेदवार घेतले मागे; विरोधकांना राजी करण्यात भाजपची शिष्टाई यशस्वी
Solapur
SolapurPudhari Photo
Published on
Updated on

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी विनायक कोंड्याल तर उपमहापौर पदी ज्ञानेश्वरी देवकर यांची अपेक्षेनुसार अविरोध निवड झाली. निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेना आणि एमआयएम या पक्षांनी महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवार रिंगणात ठेवण्याचा निर्धार केला होता. मात्र, या दोन्ही विरोधी पक्षांसोबत व्यवस्थित बोलाचाली करत त्यांचे उमेदवार मागे घेण्यासंदर्भात यशस्वी शिष्टाई करण्यात भाजपच्या सभागृहातील नेत्यांना यश आले. यामुळे ही निवड अविरोध झाली.

महापालिकेत 35 वर्षांनंतर प्रथमच विनायक कोंड्याल यांच्या रूपाने अविरोध महापौर होण्याचा इतिहास घडला. अविरोध निवड झालेले कोंड्याल हे महापालिकेच्या इतिहासातील चौथे महापौर आहेत. या निवडीनंतर महापालिका आवारात अभूतपूर्व असा प्रचंड जल्लोष करण्यात आला.

महापौर निवडीसाठी पहिली विशेष सभा शुक्रवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता महापालिकेच्या (कै.) यशवंतराव बळवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया झाली. दरम्यान, दि. 2 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे दाखल केली होती. सकाळी 11 वाजून चार मिनिटांनी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी त्यांच्याकडे महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज पिठासीन अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्याकडे सुपूर्द केले.

महापौर पदासाठी भाजपकडून विनायक रामकृष्ण कोंड्याल, शिवसेनेकडून प्रियदर्शन बाळासाहेब साठे, एमआयएमचे तौफिक बाबुमियाँ हत्तुरे यांचे अर्ज दाखल होते. उपमहापौर पदासाठी भाजपकडून ज्ञानेश्वरी महेश देवकर, शिवसेना प्रियदर्शन बाळासाहेब साठे आणि एमआयएमकडून आसिफ अहमद पीर अहमद शेख यांचा अर्ज दाखल झाला होते. पिठासीन अधिकारी गणेश निऱ्हळी यांनी या दोन्ही पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सभागृहाला सांगितली. त्यानंतर 11 वाजून आठ मिनिटांनी महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू केली. छाननी प्रक्रियेत सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर ठीक 11 वाजून नऊ मिनिटे ते 11 वाजून 24 मिनिटांपर्यंतचा अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला.

अर्ज मागे घेण्याच्या काही वेळापूर्वी शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे, एमआयएम तौफिक हत्तुरे, गटनेत्या वाहिदाबाने शेख यांच्यात चर्चा झाली. भाजपचे महापौरपदाचे उमेदवार विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, अनंत जाधव, किसन जाधव यांनी विरोधकांची मनधरणी करत यशस्वी शिष्टाई केली. सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधकांनाही समान विकास निधी देण्याच्या अटीवर शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

प्रतिस्पर्धी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात फक्त भाजप उमेदवारांचेच अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे महापौर, उपमहापौर पदासाठी मतदानाची आवश्यकता नाही असे पिठासिन अधिकाऱ्यांनी जाहीर करत सकाळी 11 वाजून 26 मिनिटांनी पिठासीन अधिकाऱ्यांनी विनायक कोंड्याल यांची महापौरपदी अविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

त्यानंतर 11 वाजून 26 मिनिटांनी उपमहापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू केली. यावेळीही ठरल्या प्रमाणे शिवसेना, एमआयएमच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र उमहापौर पदासाठी एकाच उमेदवाराचे दोन उमेदवारी अर्ज शिल्लक असल्याने 11 वाजून 43 मिनिटांपर्यंत प्रतिक्षा करण्यात आली. एकाच उमेदवाराचे दोन अर्ज शिल्लक असल्याने एक अर्ज बाद झाला. त्यामुळे उपमहापौरपदासाठी फक्त देवकर यांचाच एकमेव अर्ज शिल्लक असल्याने पिठासिन अधिकाऱ्यांनी त्यांची अविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. तसेच पिठाचे अधिकारी गणेश निराळे यांनी निवडणुकीसाठी शांततेचे सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. त्याचबरोबर नूतन महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन केले आणि सभा समाप्त केल्याचे जाहीर केले.

शहरवासीयांनी भाजपवर विश्वास टाकत मोठा विजय मिळवून दिला. सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास करतानाच शहरवासीयांना पुरेसे पाणी, चांगले रस्ते, स्वच्छता, ग्रीन झोन यांसह इतर सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांना सोबत घेऊन कामकाज करणार आहे.
- विनायक कोंड्याल, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news