Solapur Robbery Case: खांडवी शिवारात सशस्त्र दरोडा

सोन्याच्या दागिन्यांसाठी गोळीबार, एक गंभीर जखमी
Robbery
RobberyPudhari
Published on
Updated on

बार्शी : कराड येथून कंपनीची मिटिंग आटोपून हिंगोलीकडे परतणाऱ्या दाम्पत्यांवर बार्शी तालुक्यातील खांडवी गावच्या शिवारात चार अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दरोड्यात सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले असून, प्रतिकार करणाऱ्या व्यक्तीवर गोळी झाडून गंभीर जखमी करण्यात आले आहे.

याबाबत मंदा रामकिसन लोंढे (वय ३३, रा. माळहिवरा, ता. जि. हिंगोली) यांनी बार्शी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादित म्हटले आहे की, मंदा लोंढे आणि त्यांचे पती रामकिसन हे दोघेही कराड येथे कंपनीत कार्यरत आहेत. कंपनीची मासिक मिटिंग २ व ३ तारखेला कराड येथे असते. त्यानुसार १ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता त्या कंपनीतील सुमित मोरे आणि रामदास धंदारे यांच्या एमएच ३८ ए.डी. ९८४६ या कारने कराडला गेल्या होत्या. मिटिंग संपल्यानंतर ३ सप्टेंबर रोजी रात्री ९.१५ वाजता त्या पंढरपूरमार्गे हिंगोलीकडे निघाल्या होत्या.

गाडी रामदास धंदारे चालवत होते. कुर्डूवाडी पुढे आल्यानंतर त्यांना झोप आल्याने खांडवी गावाच्या अलीकडे त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. सर्वजण लघुशंकेसाठी खाली उतरले. यावेळी मंदा समोरच्या सीटवर बसल्या, तर रामकिसन ड्रायव्हर सीटवर बसणार होते, त्याचवेळी तोंडाला कापड बांधलेले २० ते २५ वयोगटातील चार तरुण पाठीमागून आले. एकाने रामकिसन यांच्या डोक्याला बंदूक लावून दागिने मागितले. मंदा यांच्या दरवाज्याजवळील इसमाने त्यांच्या कानशिलात लगावून त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण आणि कानातील टॉप्स हिसकावून घेतले.

रामकिसन यांनी गळ्यातील तीन तोळ्याची सोन्याची चेन देण्यास प्रतिकार केला असता, एका दरोडेखोराने त्यांच्या उजव्या हातावर आणि पोटावर गोळी झाडली. रक्ताच्या थारोळ्यातच त्यांनी गाडी सुमारे २ किमी पुढे नेऊन थांबवली. त्यानंतर जखमी रामकिसन यांना बार्शी येथील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

या घटनेत एकूण ३.९० लाखांचे दागिने लुटण्यात आले आहेत. या प्रकरणी चार अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आबा शिरगिरे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news