

बार्शी: बार्शी तालुक्यात खुलेआम सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीवर अखेर अन्न व औषध प्रशासन विभागाला जाग आली आहे. विभागाने सलग दोन ठिकाणी धाडी टाकून एकूण ५८ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करत दोन दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
विजय प्रभू गव्हाणे (वय ३७, रा. खांडवी), उदय संजय कोल्हे (वय २४, रा. आगळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी रामानंद स्वामी यांनी फिर्याद दिली आहे.
पहिल्या कारवाईत खांडवी येथील बस स्टँड जवळील मे. शिवसाक्षी पान टपरी वर छापा टाकण्यात आला. येथील विजय प्रभू गव्हाणे (वय ३७) यांच्याकडून केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल, आरएमडी, केआर १०००, टीटी-५, शॉट लक्झरी अशा विविध ब्रँडचा एकूण ४०,९६४.५० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई आगळगाव येथे केली. दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री आगळगाव येथील दशरथ किराणा स्टोअरवर केली. येथे उदय संजय कोल्हे (वय २४, रा. आगळगाव) यांच्याकडून १७,७३४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला. यामध्ये केआर १०००, विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल आदींचा समावेश आहे. दोन्ही आरोपींनी जनआरोग्याच्या दृष्टीने काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाची अवज्ञा करून बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठा केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याचा तपास उपनिरीक्षक आबा शिरगिरे हे करत आहेत.