Solapur News: ‘काशिनाथाचं चांगभलं‌’चा जयघोष

लाखो भाविकांच्या उपस्थितीत बावधनला बगाड यात्रा
Solapur News: ‘काशिनाथाचं चांगभलं‌’चा जयघोष
Published on
Updated on

वाई : संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी बावधन (ता. वाई) येथील ऐतिहासिक व पारंपरिक बगाड यात्रा रविवारी ‌‘काशिनाथाचं चांगभलं‌’ आणि ‌‘भैरवनाथाचं चांगभलं‌’च्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी बगाड यात्रेचे दर्शन घेतले.

बावधन येथील बगाड यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. रविवारी या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. भैरवनाथाचे बगाड गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील कृष्णा नदीवरील सोनेश्वर येथे सकाळी आठच्या सुमारास पोहोचले. यावेळी बगाड्या विठ्ठल सोपान कदम (रा. बावधन) यांना कृष्णा नदीत विधिवत स्नान घालण्यात आले. त्यानंतर देवदेवतांची पूजा-आरती करण्यात आली. पारंपरिक पोशाख परिधान करुन बगाड्यास टांगण्याचा विधी पार पडला.

भाविकांनी नोटांची व नारळांची तोरणे, झेंडे तसेच नवसाचे गोंडे बगाडास बांधले. सकाळी दहा वाजता कृष्णा नदीवरुन बगाड गाड्याचा शुभारंभ झाला. यावेळी बावधन गावासह बारा वाड्यांच्या एकीचे दर्शन घडले. कोरोना काळातही खंड न पडलेली ही परंपरा गावकऱ्यांच्या एकतेचे प्रतीक मानली जाते. बगाडाचा गाडा ओढण्यासाठी खिलार जातीचे बैल खास तयार केले जातात. अनेक शेतकरी या गाड्यासाठी नामांकित बैल खरेदी करतात. बगाड गाडा ओढताना शेतातून जाताना एका वेळी 12 बैल जुंपले जात होते. कच्च्या रस्त्यावर आल्यानंतर चार बैलांनी गाडा ओढण्यात आला. ग्रामस्थांनी वर्षभर निगा राखून बैलांना विशेष खुराक देऊन तयार केले होते. या जातिवंत खिलार बैलांचे दर्शन घेण्यासाठी अनेक शेतकरी लांबून आले होते.

बगाडाबरोबर वाघजाई देवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाच्या पालख्यांचेही भाविकांनी दर्शन घेतले. बगाड वाई-पाचवड रस्त्यावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आले. तेथे दुतर्फा हॉटेल, मिठाई, खेळणी, थंडपेय, फळे तसेच देवांच्या फ्रेमची दुकाने थाटण्यात आली होती. एसटी महामंडळाकडून यात्रेनिमित्त विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. भाविकांच्या सोयीसाठी विविध संस्था व मंडळांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. वाई व बावधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक, 108 ॲम्ब्युलन्स तसेच अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात आले होते. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास बगाड गावात पोहोचला. बगाड यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी गाड्याच्या पुढे व मागे ट्रॅक्टरवर लाउडस्पीकरची व्यवस्था करण्यात आली होती.

कृषीभूषण शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, राजू कदम, मदन भोसले, विलास पिसाळ, प्रतापराजे भोसले, विक्रमतात्या पिसाळ आदी मान्यवर भाविकांना सूचना देत होते. अनेक भाविकांनी दिलेल्या देगण्यांचा पुकारा यावेळी करण्यात येत होता. तसेच कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून भाविकांनाही सुचना देण्यात येत होत्या. पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे, पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, उपनिरीक्षक सुधीर वाळूंज, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पीएसआय, सुमारे 60 पोलीस कर्मचारी व जलद कृतीदल तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, बगाड यात्रेमुळे वाई ते पाचवड मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. साताऱ्याकडे जाणारी वाहने ओझर्डेमार्गे वळवण्यात आली. तसेच पाचवडहून वाईकडे येणारी वाहनेही पर्यायी मार्गाने सोडण्यात आली. त्यामुळे वाई शहरात काही काळ मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news