Karmala Water Supply: करमाळ्यात दिवसाआड पाणी

शहरातील जलवाहिन्या झाल्या कालबाह्य....
Karmala Water Supply: करमाळ्यात दिवसाआड पाणी
Published on
Updated on

करमाळा : करमाळा शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणात नियमित मुबलक पाणीसाठा असूनही शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याने शहरवासीयांना कायम पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे.

करमाळा शहरात उजनी जलाशयातील दहिगाव पंपिंग केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. शहरातील मौलाली माळावरील जलशुद्धीकरण केंद्र व श्रीदेवीचामाळ येथील जलकुंभातून शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. करमाळा शहराची लोकसंख्या २४ हजार असली तरी शहर व परिसरात ३५ हजार लोकांचे वास्तव्य आहे. शहरातील मौलाली माळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात दहिगाव पंपिंग केंद्रातून दररोज तब्बल २४ लाख लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. तरीही शहरात दररोज पाणीपुरवठा न करता एक दिवसाआड शहरास पाणीपुरवठा करावा लागतो.

करमाळा शहरातील जलवाहिन्या कालबाह्य झालेल्या असून सन १९९९-२००० सालामध्ये केलेल्या जलवाहिन्या सम पातळीत गाडल्या गेल्या नसल्याने तेव्हापासून ते आजतागायत शहरात सर्व दूर समसमान पाणीपुरवठा होऊ शकत नाही. याचा परिणाम शहरात कुठे कमी दाबाने तर कुठे जास्त दाबाने पाणीपुरवठा होतो. यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ नगरपालिका प्रशासनावर गेल्या पंधरा वर्षांपासून आली आहे.

शहरातील जलवाहिन्या सदोष व कालबाह्य झाल्याने दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर नळाद्वारे थेट पाणीपुरवठा होत नसल्याने विद्युत मोटारी लावून पाणी खेचावे लागते व पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्या लागतात. यामुळे ग्राहकांना वीज पुरवठ्याचा भुर्दंड कित्येक वर्षांपासून सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक भागात पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने घरासमोर नळ कनेक्शनला खड्डे खोदून पाणी विद्युत मोटारीद्वारे खेचावे लागते शिवाय सर्वांना पाणी मिळावे यासाठी शहरात दररोज सकाळी आठ ते साडेआठ असे अर्धा तास वीजपुरवठा खंडित करावा लागतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news