

करमाळा: पुढारी वृत्तसेवा : बांधकाम साहित्य व खडी वाहतूक करणाऱ्या टिपर व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात करमाळाजवळील मौलाली चौकात आज (दि.२२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. महादेव पांडुरंग भोसले (वय ६५, रा. रेडा, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अपघातात मृत झालेल्याचे नाव आहे. तर आदिनाथ पांडुरंग भोसले (वय ६०) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, महादेव व आदिनाथ हे दोघे सख्खे भाऊ शेलगाव वीराचे येथे जागरण गोंधळण्याच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी (दि. २१) गेले होते. ते दुचाकीवरून (एम एच ४२/एन ५३८२) आज सकाळी जातेगाव येथील मुलीला भेटून ते करमाळा येथे आले होते. करमाळ्यातही ते पाहुण्याच्या घरी पाहुणचार करून दुपारी रेडा या गावी परत निघाले होते.
यावेळी करमाळा टेंभुर्णी रस्त्यावर मौलाली चौकाजवळ गुळसडी कडे जाणाऱ्या इदगाह जवळील रस्त्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या टिपरने (एम एच १६/ए ई ९५९९) वळण घेतले. यावेळी झालेल्या विचित्र अपघातात मोटर सायकलच्या मागच्या चाका खाली सापडून महादेव गंभीर जखमी होऊन जागेवरच ठार झाले. तर आदिनाथ गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका चालवणारे आसिफ पिंजारी तसेच मेजर साजिद शेख यांनी मदत कार्यासाठी धाव घेतली. यावेळेस अपघात पथकातील हवालदार मयूर गव्हाणे , पोलीस फौजदार गुटाळ, प्रदीप जगताप, वेनगुले यांनी मदत कार्य राबवून जखमी तसेच अपघातातील वाहने बाजूला करून मदत केली. यावेळी जखमी आदिनाथ यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारासाठी अकलूज येथे नेण्यात आले. दरम्यान अपघातानंतर चालक टिपर वाहन टाकून पळून गेला होता. या अपघाताची नोंद करमाळा पोलिसात झाली असून या अपघाताचा तपास करमाळा पोलीस करीत आहेत.