

Karmala Jeur Minor girl death
करमाळा : तालुक्यातील जेऊर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिने जीवन संपविल्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात करमाळा पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याचे सांगत, राजकीय दबाव आणि आर्थिक व्यवहारांमुळे संशयित आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी तृप्ती देसाई यांनी करमाळा पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलिसांकडून प्रकरणाची माहिती घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या सविता शिंदे, नलिनी जाधव, भावना गांधी, गीता कापडी, इंगवले, चौरे तसेच विवेक येवले, डॉ. कापडी, मोरे उपस्थित होते. त्यांनी पोलीस निरीक्षक रणजीत माने आणि तपास अधिकारी गिरीजा मस्के यांची भेट घेऊन तपासाची माहिती जाणून घेतली.
पत्रकारांशी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, या प्रकरणाची फिर्याद 13 फेब्रुवारी रोजी दाखल झाली असून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. अत्याचार प्रकरणातील आरोपींना राजकीय दबावामुळे संरक्षण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, मुलीच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टेम अहवालात फेरफार झाल्याची शंका व्यक्त करत ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सर्व पार्श्वभूमीवर, प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होण्यासाठी तपास सीआयडीकडे सोपवावा, अशी ठाम मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.