Solapur News : करमाळ्यात ३,४०१ रेशनकार्ड बंद

ऐन दीपावलीच्या तोंडावर हजारो कुटुंबांचा धान्यपुरवठा थांबला!
Ration Card
Ration Card Pudhari
Published on: 
Updated on: 

कर‌‌माळा : ऐन दीपावलीच्या तोंडावर करमाळा तालुक्यातील हजारो रेशनकार्डधारकांची शासनाच्या ‘मिशन सुधार’ या मोहिमेंतर्गत तपासणी सुरू असून, आतापर्यंत तालुक्यातील ६ हजार ६२६ रेशनकार्डांची तपासणी करण्यात आली आहे.

यामध्ये पात्रतेच्या निकषांत बसत नसल्याचे आढळलेल्या ३ हजार ४०१ रेशनकार्डांचा लाभ बंद करण्यात आला आहे. यामध्ये अंत्योदय अन्‍न योजनेतील ३०८ आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील ३ हजार ९३ रेशनकार्डांचा समावेश आहे. या कार्डधारकांना यापुढे रेशनकार्डवरून मिळणारे धान्य व संबंधित शासकीय लाभ मिळणार नसल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

शासनाकडून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र, दुबार, बनावट तसेच निकषांमध्ये न बसणाऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवून पात्र गरजू कुटुंबांनाच धान्याचा लाभ मिळावा, यासाठी ‘मिशन सुधार’ मोहीम राबवली जात आहे.या मोहिमेत रेशनकार्डवरील नोंदी, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्‍न, आधारशी जोडलेली माहिती, वाहनांची नोंद आणि धान्य उचलण्याची स्थिती तपासली जात आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रेशनवर धान्य घेणाऱ्या कुटुंबांचीही आता पुन्हा पात्रता तपासली जात आहे.

पुरवठा विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार करमाळा तालुक्यात अंत्योदय अन्न योजनेची ३ हजार ९६३, प्राधान्य कुटुंब योजनेची २८ हजार ७०७ आणि अप्राधान्य कुटुंबांची २८ हजार ९९० अशी एकूण ६१ हजार ६६० रेशनकार्डे आहेत. या कार्डांवर एकूण २ लाख ५२ हजार ६५६ लाभार्थी सदस्यांची नोंद आहे. यामध्ये एएवाय प्रवर्गातील १६ हजार २८०, पीएचएच प्रवर्गातील १ लाख २४ हजार ८०८ आणि एनपीएएच प्रवर्गातील १ लाख ११ हजार ५६८ सदस्यांचा समावेश आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र, दुबार आणि चुकीच्या नोंदी असलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून पात्र व गरजू कुटुंबांपर्यंत शासकीय धान्याचा लाभ पोहोचविला जातो. तपासणीमध्ये अपात्र आढळलेल्या लाभार्थ्यांवर नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.
- शिल्पा ठोकडे, तहसीलदार करमाळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.