

पंढरपूर : करकंब येथील नेमतवाडी चौक परिसरात दि. १३ ऑगस्टच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तीन दुकाने फोडून रोख रक्कम, कृषी साहित्य, मोबाईल, केबल, मोटारी व इतर साहित्य असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
याबाबतची माहिती अशी की, येथील नेमतवाडी चौकातील साईप्रसाद मशिनरी अँड स्पेअर्स या दुकानाच्या बाजूचा पत्रा कटरच्या सहाय्याने कापून आत प्रवेश केला. येथून रोख २०० रुपये, सुमारे ६३ हजार रुपये किंमतीचे ३० स्प्रे पंप, तसेच २ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा ऐवज चोरून नेला.
चोरट्यांनी दिनेश चौधरी यांच्या महादेव मशिनरी या दुकानाचा पत्रा कापून प्रवेश केला. येथून १ हजार २५० मीटर केबल (किंमत १ लाख १२ हजार ५०० रुपये), ३१ हजार रुपये किंमतीच्या दोन सबमर्सिबल मोटारी, २२ हजार रुपये किंमतीच्या आठ टिल्लू मोटारी, तसेच ४ हजार रुपये किंमतीचा डीव्हीआर असा मोठ्या किंमतीचा माल लंपास करण्यात आला. सोमनाथ घाडगे यांच्या मेडिकल दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश करण्यात आला. येथून रोख १ हजार ५०० रुपये आणि १ हजार ६०० रुपये किंमतीचे बॉडी स्प्रे चोरीस गेले.
एकाच रात्री सलग तीन दुकाने फोडून चोरी झाल्याने करकंबमधील व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बाजारपेठेतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरात रात्रीच्या गस्तीत वाढ करून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
सहा चोरटे सीसीटीव्हीत कैद
दि. १४ रोजी एक वाजून २१ मिनिटांनी येथील जळोली चौक परिसरातील बंडू मोरे, समाधान गुंड व अनिल आरकस यांच्या दुकानांबाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी कापून चोरीचा प्रयत्न केला. मात्र हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात आधीच कैद झाला असून त्यात तब्बल सात संशयित चोरटे दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत.