

बार्शी : रेल्वेत तिकिट तपासणीस पदावर नोकरी लावतो, असे आमिष दाखवून बार्शी तालुक्यातील तिघांची 11 लाख 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुरेंद्र व्हि. कुलकर्णी, संकेत खंडेराव पायगुडे व नितीन नागेश मोहिरे अशी बार्शी शहर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत. पानगाव येथील शेतकरी सुभाष बाबू डेंगळे (वय 62) यांनी दिलेल्या जबाबानुसार, त्यांचा मुलगा चंद्रकांत याचे सिव्हिल डिप्लोमा शिक्षण झाले आहे. दहा वर्षांपासून ओळखीचे असलेले सुरेंद्र व्हि. कुलकर्णी (झरेगांवकर), रा. ढगे मळा, बार्शी यांनी जानेवारी 2025 मध्ये मुलाला रेल्वेत नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. यासाठी 10 लाख रुपये लागतील, नंतर 8 लाखांवर तडजोड झाली. ॲडव्हान्स म्हणून 4 लाख रुपये रोख द्यावे लागतील असे सांगितले.
डेंगळे यांनी शेळ्या विकून व उसनवारीने 20 मार्च 2025 पर्यंत 4 लाख रुपये सुरेंद्र कुलकर्णी यांना त्यांचा मुलगा बालाजी कुलकर्णी याच्यासमोर टप्प्याटप्प्याने दिले. 5 एप्रिल 2025 रोजी ऑर्डर निघेल असे सांगण्यात आले. मात्र महिना उलटूनही काम झाले नाही. त्यानंतर कुलकर्णी यांनी पुण्यातील संकेत खंडेराव पायगुडे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले व पैसे त्यांनाच पाठवले असल्याचे सांगितले.
संकेत पायगुडे व सुरेंद्र कुलकर्णी यांनी आणखी दोन जागा शिल्लक असल्याचे सांगून नातेवाईकांची मुले पाहण्यास सांगितले. डेंगळे यांनी रस्तापूरचे आजिनाथ मोहिते व पानगांवचे रशीद इनामदार यांना संपर्क साधला. मार्च 2025 मध्ये मोहिते व इनामदार यांनी सुरेंद्र कुलकर्णी यांना भेटून मुलांचे कागदपत्रे दिली. प्रत्येकी 8 लाख रुपये, त्यापैकी 4 लाख ॲडव्हान्स मागण्यात आले.
एप्रिल 2025 च्या पहिल्या आठवड्यात बार्शीतील राणी लक्ष्मीबाई उद्यानात संकेत पायगुडे यांची भेट झाली. त्याने पुण्यातील नितीन नागेश मोहिरे हा रेल्वेतील मोठा अधिकारी असून त्याच्या सहीशिवाय ऑर्डर निघत नाही, असे सांगून त्याच्या बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार आजिनाथ मोहिते यांनी 7 एप्रिल ते 7 मे 2025 दरम्यान 3,80,000 रुपये व रशीद इनामदार यांनी 4,00,000 रुपये नितीन मोहिरे यांच्या खात्यावर पाठवले. डेंगळे यांचे 4 लाख रोख असे एकूण 11,80,000 रुपये घेण्यात आले.
वारंवार विचारणा करूनही ऑर्डर न निघाल्याने व नितीन मोहिरे याचा फोन बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पैसे परत मागितल्यावर सुरेंद्र कुलकर्णी यांनी दमदाटी करून पोलीस केस करण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.