

सोलापूर : दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी ७० फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स या सराफ दुकानात पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दोन नेकलेस लुटून नेल्याची घटना शनिवारी (दि. १३) सकाळी साडेबाराच्या सुमारास घडली. भरदिवसा झालेल्या या सशस्त्र चोरीने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्वेलर्सचे मालक खुर्शीद आलम शेख यांचे ७० फूट रोडवर शिवकुमार ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शनिवारी सकाळी त्यांचा कामगार शिवकुमार भागानगरी हा दुकानातून स्वच्छता करून बाहेर गेला होता. ते एकटेच दुकानात बसले होते. दरम्यान, दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीवरून (एम.एच. ४५ बी.ए. ९९५१) तिघे दुकानासमोर आले. त्यातील दोघे दुकानात घुसले, एकाच्या हातात पिस्तूल, तर दुसऱ्याच्या हातात चाकू होता. खुर्शीद यांनी चपळाईने दुकानाच्या पाठीमागच्या दरवाजातून धावत दुसऱ्या बाजूने रस्त्यावर येऊन आरडाओरड केली. तेवढ्या दहा सेकंदात एका चोरट्याने शोकेसमधील सोन्याचे दोन नेकलेस घेऊन पोबारा केला. दुकानाबाहेर दुचाकी तशीच सोडून तिघे चोरटे कुंभारी नाक्याकडे पळत सुटले. बाजूच्या बोळातून तिघेही फरार झाले.
खुर्शीद शेख यांनी तातडीने पोलिसांना पाचरण केले. सहा. पोलिस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. खुर्शीद शेख यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार लाख ९४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन नेकलेस चोरल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व विभाग सराफ असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश बिटला, सुवर्णकार फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष सिध्दाराम शिंगारे यांच्यासह सराफांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या घटनेनंतर सराफ व्यापाऱ्यांना शस्त्र परवाने देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली.
सीसीटीव्हीमध्ये घटना कैद
चोरटे मोठी लूट करण्याच्या इराद्यानेच दुकानात आले होते. सराफ खुर्शीद हे एकटे असल्याने त्यांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून गप्प करायचे आणि सोन्याची लूट करण्याचा त्यांची योजना असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसते. चोरटे मोठी लूट करण्याच्या उद्देशानेच आल्याचे दिसून आले.