

कुर्डूवाडी : संशयित आरोपींच्या शोधार्थ भर थंडीत उसाच्या फडात लपून... अर्धवट बांधकामावर तासन्तास बसून... अनेक रात्री जागून काढत... पोलिसांनी अखेर साडेपाच कोटींच्या दागिन्यांच्या चोरट्यांचा छडा लावलाच. विशेष म्हणजे या कामगिरीत पोलिसांनी स्वतःची वाहने न वापरता चक्क बांधकामावरील टिप्परचा वापर केला.
गोरेगाव मुंबई येथील सोन्या-चांदीचे दागिने विक्री करणारे व्यापारी अभयकुमार मदनलाल जैन हे सोलापूर येथे दागिने विक्रीस आले असता सोलापुरातून मुंबईला सहा डिसेंबर रोजी सिद्धेश्वर एक्सप्रेस मधून जाताना साडेपाच कोटी रुपयांचे दागिने रात्री प्रवासात चोरट्याने लंपास केले होते. यातील प्रमुख आरोपी फुलचंद छगन गुंजाळ (वय 52, रा. बारलोणी, ता. माढा) याला गावातून फिल्मी स्टाईल पकडण्यात यश आले. मात्र, हिऱ्या गुंजाळ व लाल्या गुंजाळ हे दोन संशयित पळून गेले. त्यांचा शोध सुरू आहे.
दागिन्यांच्या चोरीविषयी कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे अभय जैन यांनी गुन्हा नोंद केला आहे. गोरेगाव येथून 4 डिसेंबर 2025 रोजी कुमार जैन हे सोलापूर येथे ते मुलीसह सोन्याचे दागिने घेऊन व्यापाऱ्यांना विक्रीसाठी आले होते. दिवसभर विविध व्यापाऱ्यांना दागिने विकून, रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेसने गोरेगावकडे निघाले. दि. 6 डिसेंबर 2025 रोजी रेल्वेत स्लीपर कोचमध्ये झोपलेले असताना कुमार जैन यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरली. त्यातील साडेचार किलो वजनाचे, अंदाजे किंमत साडेपाच कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली होती.
या गुन्ह्याचा तपास मुंबई रेल्वे क्राईम ब्रँचही करीत आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. कलासागर, सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, खेडकर, कांदे, शिंदे, सपोनी सातपुते, सुळे व पथकाने गुन्हा उघडकीस आणला. सदर प्रकरणी बारलोणी (ता. माढा) येथील संशयित आरोपी फुलचंद गुंजाळ यास अटक करण्यात आली आहे. धनराज साहेबराव गुंजाळ, दिलीप साहेबराव गुंजाळ, हिरा शंकर गुंजाळ, लाल्या शंकर गुंजाळ (सर्व रा. बारलोणी) सागर डिकोळे, विकास डिकोळे, पुणेकर डिकोळे (रा. वडशिंगे, ता. माढा) यांनी सर्व संशयितांनी संगमताने दागिने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
वाळू वाहणारा टिपर वापरला पोलिसांनी
बारलोणीतील (ता. माढा) वडार वस्तीमध्ये संशयित आरोपी लपल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले होते. त्यामागार मुंबईतून मोठ्या संख्येने आलेल्या पोलीसांनी आपले वाहन न वापरता खडी, वाळू वाहणारा टिपर वापरला. त्यामध्ये बसून पोलिस बारलोणीत आले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी वडार वस्तीला घेराव घातला, तसेच काही घराची झडती सुरू केली. यामध्ये संशयित फुलचंद गुंजाळ यास पकडण्यात यश आले तर इतर दोन आरोपी पळून गेले.
महिनाभर पोलीस मागावर
पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे गेले एक महिना संशयित आरोपीच्या मागावर होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी शोध मोहीम सुरू केली, परंतु त्याला यश आलेच नाही. यामुळे त्यांनी बार्शी पोलीस ठाण्यातील विश्वासू पोलीस शिपाई दत्ता सोमवाड यांची या कामी खास नेमणूक करून घेतली. शिवाय स्वतः रात्री- अपरात्री जागून संशयित आरोपीचा माग काढला. संशयित आरोपी आल्याचे कळताच त्यांनी मुंबई येथून भला मोठा पोलिसांचा फौज फाटा मागवला. त्यासर्वांच्या सहकार्यातून ही कारवाई एक महिन्याच्या आत यशस्वी केली. चिमणा केंद्रे हे कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात होते, त्यावेळेसही अनेक गुन्ह्याचे तपास लागले होते.