

सोलापूर : शहरातील दोन बडे सराफ व्यापारी, एक वकील तसेच एका बांधकाम व्यावसायिकावर बुधवारी (दि. 19) सकाळी केंद्रीय आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. सराफ व्यापाऱ्यांच्या दुकानात तिसऱ्या दिवशीही तपासणी सुरू होती.
बुधवारी सकाळी सहा वाजता सुरू झालेली तपासणी गुरुवारी दिवसभर सुरू होती. वकील व बिल्डरच्या घराची व कार्यालयाची तपासणी पूर्ण झाली असून सराफ व्यापाऱ्यांची चौकशी तिसऱ्या दिवशीही सुरू होती. त्यामुळे सराफ कट्ट्यातील त्यांची दुकाने तसेच जुने विठ्ठल मंदिर येथील दुकानात आयकर अधिकारी शुक्रवारी दिवसभर ठिय्या मांडून होते. यातील एका सराफाचे अनेक व्यवहार हे रोखीने होत होते. यामध्ये मनी लॅण्ड्रींगचा मोठा प्रकार सुरु होता. त्यामुळे त्यांची गेल्या पंधरा वर्षातील सर्व कागदपत्रे, व्यवहार तपासण्याचे काम सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
कागदपत्रे, हार्ड डिस्क घेऊन टीम रवाना
या दोन्ही सराफ व्यावसायिकांची तपासणी अजून किती दिवस चालणार याची माहिती मिळू शकली नाही. एकीकडे ही कारवाई सुरु असताना दुसरीकडे आयकर विभागाची मुख्य टीम या तपासणीत मिळालेली कागदपत्रे, हार्ड डिस्क घेऊन रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खबऱ्याच्या टीपमुळे कारवाई ?
सोलापुरातील या बड्या सराफ, बिल्डर, वकिलाच्या घरी आयकर विभागाने छापा मारला. हा छापा पडण्यामागे मोठे आर्थिक व्यवहार, मनी लॉड्रिंग, जागांची खरेदी व्यवहार असल्याची चर्चा आहे. हे सर्व व्यवहार आयकर विभागाला सोलापुरातील एका खबऱ्याने दिल्याची माहिती समोर येत आहे. या व्यवहारांची कागदपत्रे तसेच इत्थंभूत माहिती आयकर विभागाला देण्यात आली, त्याची पडताळणी करूनच आयकर विभागाने एवढा मोठा छापा मारला; परंतु या मोठ्या व्यावसायिकांची माहिती कुणी लिक केली.